............पावसाळ्याचे दिवस होते .मावळ भाग असल्यामुळे तिथे नेहमी पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असतो. जिकडे पहावे तिकडे हिरवळ ,धो-धो पडणारा मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि त्याबरोबर सोसाट्याचा वारा .
अशी सगळी भयानक परिस्थिती त्याठिकाणी असते. गावात असणारी घरेही फार विचित्र होती. जवळ जवळ न बांधता ,एकमेकांपासून दूर दूर अंतरावर घरं बांधलेली होती.
घराच्या आजूबाजूला भरपूर वनराई होती, खूप झाडं होती आणि घराला कुंपण म्हणून झाडं काटेरी लावलेली होती. सुंदर अशी फूलही त्याला लगडलेली होती .
जेवढे सुंदर वातावरण होतं तेवढंच ते भयानक होतं ,त्या गावातलं एक तीन माणसांच कुटुंब.त्यांचं एकुलते एक अपत्य म्हणचे तनु.
....तनु.....
एक कॉलेजला जाणारी सर्वसामान्य मुलगी. तिचं आयुष्य म्हणजे सकाळी उठणे ,काही कामे करून स्वतःचं आवरून कॉलेजला जाणे, दिवसभर कॉलेज अटेंड करून बसने परत घरी येणे .त्यांच एक छोटंसं पण सुटसुटीत आणि छान घर होतं.
.......दोनच खोल्या असल्या तरी, त्या खूप प्रशस्त आणि सुंदर ठेवलेल्या होत्या. समोरच मोठं अंगण होतं आणि परसदारात सुंदरशी बाग....... त्यांच्या घरामध्ये ते तिघेच राहायचे .आई-बाबां आणि तनु .खूप छान कुटुंब होते त्यांचं. दररोज आपली कामं करून रोज एकमेकांशी छान गप्पा मारत रात्री जेवणारं, नेहमी आनंदी असणारं हे कुटुंब होतं.घराच्या जवळच एक सुंदर असा ओढा होता. तनूला तो ओढा खूप आवडायचा आणि वातावरणाच्या सुंदरतेत सुद्धा ओढ्यामुळे आणखी भर पडायची.
इतर घरही याप्रमाणेच एकटीच असायची.तिथल्या माणसांची घरं लांब असली तरी मनाने मात्र सगळे खूप जवळ होते . सगळ्या गावाचे वातावरण खूप प्रसन्न आणि उत्साही होते.
..... त्या दिवशी सकाळी सकाळी आईबाबांची खूप लगबग चालली होती. ते पाहून तनु आईला म्हणाली ,"आई, कसली गडबड आहे तुमच्या दोघांची? काही महत्वाचं काम आहे का? कुठे बाहेर जायचंय का? हे ऐकून
आई तनुला म्हणाली ,"अगं हो,आपलं थोडं काम आहे शेतीचं, त्यासाठी तालुक्याच्या गावी जावं लागणार आहे."
तनु- , " मग काय प्रॉब्लेम आहे, सकाळी लवकर
निघालात की दुपारपर्यंत परत मागे याल सुद्धा."
आई -," हो, पण आत्ताची बस होती 9 ची, ती गेली ना.
नंतर बारा वाजताच्या बसने जायचं म्हणजे रात्री
यायला थोडा उशीर होईल."
तनु - ," थोडा उशीर झाला तर होऊदे, नको काळजी
करू. मी स्वयंपाकाच पहाते.तोपर्यंत यालच की तुम्ही."
तनूचे हे शब्द ऐकून आई खूप भारावून गेली .आपली मुलगी किती समजूतदार झाली या गोष्टीने तिला खूप समाधान वाटले .आई-बाबांचे बारा वाजताच्या बस ने जायचे ठरवले. तनु त्यांची मदत करत होती तिच्या कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती घरीच होती.घरातली उरलेली सर्व कामे दोघांनी मिळून आवरली आणि आई-बाबांना बससाठी थांबावं लागेल म्हणून ते लवकरच निघाले.तनुला आईने बाहेर कुठं जाऊ नको असे बजावले होते.मुलीला एकटीला पहिल्यांदाच ठेवत असल्यामुळे आईच्या जीवाची घालमेल होत होती.पण जाणंही महत्वाचं असल्यामुळं तीने भावना आवरल्या.
घर जोत्याचं असल्यामुळे त्याच्यावर उभं राहिलं की समोरच्या डोंगराजवळून बस गेल्याचं स्पष्ट दिसायचं, बस आता डोंगराआड गेली होती. सगळ्या घरात ती आता एकटीच होती.दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट सबमिट करायचा असल्यामुळे उरलेल्या दिवसात तिने प्रोजेक्ट पूर्ण करायचा ठरवला .आई-बाबा गेल्यानंतर तिने लगेचच प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. प्रोजेक्टचं काम करत असल्यामुळे दिवस कसा गेला तिला कळलंच नाही .तोपर्यंत पाऊसही चांगलाच बरसला होता.वादळी वाऱ्यासह, विजांचा कडकडाटही चालूच होता.
जसा दिवस मावळू लागला तशी तिच्या जीवाची घालमेल वाढली होती. तिचे आई-बाबा अजूनही घरी आले नव्हते, त्यामुळे तिला जरा काळजी वाटू लागली.8 वाजून गेले होते आणि आई बाबा अजूनही आले नव्हते.तिने तोपर्यंत स्वयंपाक करून घेतला. तिला वाटले की आईबाबा आले की लगेचच जेवायला घेऊया.ती आता थोडी घाबरायला लागली होती.तिला एकटीने राहायची अजिबात सवय नव्हती.विशेष म्हणजे तिला अंधाराची खूपच जास्त भीती वाटायची.
आई बाबांची तनु एकुलती एक मुलगी असल्याने त्यांनी तिला खूप मायने आणि प्रेमाने सांभाळलं होतं.तनुचाही तिच्या आई वडिलांवर खुप जीव होता. म्हणून तर तिला खूप शिकून आपल्या आई वडिलांसाठी काहीतरी करायचं होतं.
घरातील लँड लाईन फोनची रिंग वाजली, हे मात्र विशेषच होतं की,एवढ्या वादळी पावसातही फोन चक्क चालू होता.
तनूने फोन उचलला आणि ती बोलू लागली.," हॅलो, हा,आई कुठे आहात तुम्ही?अजून का आले नाही.पाऊस सारखा पडतोय विजापण खूप कडाडत आहेत.तुम्ही लवकर या ना."
आई - "हॅलो ,तनु एक बाळा इकडे बस फेल झाली आहे त्यामुळे आम्हाला आज येता येणार नाही.तू एक काम कर वरच्या काकूंच्या घरी जा, मी त्यांना सांगितले आहे,तुला 15 मिनिटात काका नाहीतर दादू न्यायला येईल, तोपर्यंत तू सगळं आवर बॅटरी आणि छत्री घेऊन बाहेर रस्त्यावर येऊन ......." बोलता बोलता आईचा फोन मधेच कट झाला आणि फोनपण बंद झाला.
आता मात्र तिला कससच वाटू लागलं, तेवढ्यात लाईटपण गेले..........दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखं झालं.तनु आता पुरती घाबरली होती.तिला चांगलाच घाम फुटला.तिने लगेच एक छत्री आणि हातात बॅटरी घेतली व पटकन बाहेर आली ,दरवाजा बंद करताना तिला आतून कोणीतरी ओढत असल्याचा भास झाला, खरतर ते सगळे तिच्याच मनाचे भास होते.तिने तसाच भीत भीत धाडकन दरवाजा लावला .घराला तीनच पायऱ्या होत्या पण त्या उतरतानाही तनु 2 वेळा धडपडली.अंगणात उभी राहिली समोरचं चित्र पाहून तिचे तर धाबेच दणाणले,
सगळीकडे काळोख ,विजेच्या उजेडात दिसणारी झाडं आता भुताच्या फिल्म मधल्या जंगलासारखी वाटत होती,खळखळ आवाज करत वाहणारा तिचा आवडत ओढा आता गंभीर आवाज करत होता.तिने एका हाताने छत्री पकडली आणि एक हातात बॅटरी धरून जाऊ लागली.तिला पायात चप्पल घालायचेही भान नव्हते, पण आता आत जाऊन चप्पल आणण्याचं धाडसही तिच्याकडे नव्हतं.
पावसाने तर आता कहरच केला होता,त्याचा कोसळण्याचा वेग आता दुप्पटीने वाढला होता. तनूचे शरीर एवढ्या पावसातही घामाने भिजले होते. वीज कडाडली की घाबरून टुणकन उडत होती.समोरूनही कोणीच आल्याच दिसत नव्हते.ती तशीच पुढे जात होती.पायाला वाहणारे पाणी जणू ओढू लागले होते.
अचानक खूप सोसाट्याचा वारा .......वारा कसला वायु रुपी राक्षसच म्हणा त्याला.त्या वाऱ्याने तिच्या हातातली छत्रीही उडून गेली.तशी ती जास्तच भेदरली.कारण पाऊस एवढ्या जोरात पडत होता की डोळे उघडनेही शक्य नव्हते.तिच्या हातात बॅटरी होती पण तिला पुढे फक्त पावसाच्या धाराच दिसत होत्या. तिच्या बॅटरीच्या आतही पाणी घुसले होते,त्यामुळे बॅटरीची झाकझुक होऊ लागली,आता तर तनूची घाबरगुंडीच उडाली .काही सेकंदात बॅटरीही बंद झाली आता उरला फक्त आणि फक्त काळोख...
तेवढ्यात तिला समोरच्या बाजूने एक बॅटरीचा प्रकाश दिसला. तिचा जीव भांड्यात पडला.ती हाक मारू लागली…
तिचा चुलत भाऊ होता त्याने आवाज देऊन 2मिनिटे थांबायला सांगितले. तो येत होता तिला घ्यायला.पण तनुला कुठे दम पडतोय.तिला आता काही थांबावेना , ती पुढे जात असताना......भाऊ आता जवळ जवळ पोहोचलाच होता......
तेवढ्यात खूप जोराने वीज कडाडली , आगीचा गोळा धाडकन तनुच्या जवळच्या झाडावर पडून जमिनीवर पडला,तिने आज पहिल्यांदाच वीज म्हणजे काय ते प्रत्यक्षात पाहिलं होतं.जमिनीला पडलेला खड्डा क्षणात पाण्याने तुडुंब भरून वाहू लागला,पाण्याच्या वेगाने तनुच्या पायाखालची माती कधी सरकली हे तिलाही समजलं नाही.
तिचा तोल जाऊन ती त्या खड्ड्यात पडली, पोहता येत नसल्यामुळे ती त्या पाण्याच्या प्रवाहाला विरोध करत गटांगळ्या खाऊ लागली, तोपर्यंत सगळ्या रस्त्याची जागा एक मोठ्या प्रवाहाने घेतली,त्यामुळे तिच्या भावाला काहीच करता येत नव्हते.त्यात काळोखामुळे काहीच समजत नव्हतं.तो तसाच धावत इतर लोकांना मदतीला बोलवायला गेला,कारण,हे सगळं पाहून तोही घाबरला होता. सगळे लोक धावतच तिथे आले.
तनु मदतीसाठी खूप ओरडत होती,तिच्या नाका तोंडात पाणी जात होतं तरीही तिने हार मानली नव्हती .ती पकडण्यासाठी आधार शोधत होती पण, पावसाचा जोर आणखीनच वाढला,वादळामुळे लोकही हतबल झाले, अचानक ओढ्याला पाण्याचा खूप मोठा लोंढा आला.तो समोरून येताना पाहून,तनु जोरात ओरडली,"वाचवा काका,आई ,बाबा दादा........"
तीच दुर्दैव एवढं की तिचा आवाजही त्यांच्यापर्यंत पोहचू शकला नाही…
पाण्याबरोबर आलेल्या गाळामुळे तिला हातपायही हलवता आले नाही.काळाने मोठा घात केला होता.तनुच्या आयुष्याची ज्योत मालवली होती. आख्ख्य गाव एव्हाना जमा झाले होते, पण आता त्याचा काहीच उपयोग नव्हता.
पहाटे पहाटे पाऊस ओसरला, तसं तनुला शोधायची मोहीम चालू झाली.ती अखेर 11 वाजता थांबली कारण 4-5 गाव ओलांडल्यानंतर एका झाडाच्या फांदीला ती अडकली होती. ती आता या जगात नव्हती.
आई बाबा आल्यावर घराजवळच्या गर्दीला पाहून त्याच्या काळजाचा ठोकाच चुकला.पुढे आल्यावर आपल्या मुलीचा मृतदेह पाहून त्या माउलीला धक्काच बसला,ती पूर्णपणे शांत झाली,ना रडली,ना बोलली फक्त एकटक मुलीच्या चेहऱ्याकडे पाहत होती.वडीलांच्या तर पायांमधील त्राणच गेलं होतं,"आपण का गेलो तालुक्याच्या गावाला? असं ते स्वतःच्या मनाला डीवचू लागले.आपण असतो तर .....देवा ...एवढा कसा निष्ठुर झलास....तनु....तनु...."
पण या सगळ्या जर-तरच्या गोष्टी होत्या .एका रात्रीत सगळं होत्याच नव्हतं होऊन बसलं, सोन्यासारखं घर कोलमडून पडलं होतं.सारं अघटित घडलं होतं.तनुसाठी काळरात्र ठरली,..................ती रात्र......
लेखिका - कावेरी डफळ
खूप सुंदर!
ReplyDeleteखुप छान आणि भावनिक शब्द मांडणी आहे... मार्मिक
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteNice writing
ReplyDelete