Wednesday, 27 January 2021

टिमकू मासा


टिमकू मासा एका स्वच्छ , निळ्याशार तलावात राहायचा . टिमकूला आईबाबांबरोबर तलावात पोहायला , मित्रांबरोबर खेळायला खूप आवडायचं

एकदा त्या तलावकाठी काही माणसे फिरायला आली . त्यांना सुंदर तलाव , तलावतले मासे , काठवरची झाडी खूप आवडली . त्यांनी तिथे खूप फोटो काढले , खेळ खेळले,मज्जा केली.त्यांनी तलावाची गंमत आपल्या मित्रमैत्रिणींना सांगितली. मग हळूहळू तिथे खूप माणसे येऊ लागली. खाऊ,खेळण्यांच्या गाडया उभ्या राहिल्या. येणारी माणसे काठावर ,पाण्यात कागद ,प्लॅस्टीकच्या पिशव्या,बाटल्या ग्लास टाकून कचरा करु लागली. तलावाचे निळेशार पाणी घाण होऊ लागले .

टिमकूला वाटले काहीतरी करायला हवे , काय बरं करु या ? आपण एक छान घर बांधू या .टिमकूने पाण्यात फेरफटका मारला आणि एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन आला . पिशवीला सगळीकडून छान सजवून घर तयार केलं .त्यानी आनंदानी आईबाबांना घर बघायला बोलवले , ते छान म्हणणार इतक्यात मोठी लाट आली आणि लाटेबरोबर पिशवी वाहून गेली .

टिकूला वाईट वाटलं पण बाबा म्हणाले तू परत दुसरं बनव आणि आता काहीतरी जड वस्तू घे.

हो म्हणून टिकू लागला कामाला . पुन्हा पाण्यात शोधू लागला.यावेळी त्यानी काठवरचा कागदी बॉक्स घेतला आणि पुन्हा सजवून घर बनवलं. आईबाबांना घेऊन आला पण तो पर्यंत बॉक्स ओला होऊन खराब झाला होता.बाबांनी त्याला समजावलं,अजून एक प्रयत्न कर

आता मात्र टिमकू शांतपणे तलावात फिरला ,सगळीकडे नीट बघितले आणि विचार करुन एक सरबतचा पत्र्याचा डबा घेतला, त्यात रंगीत छोटे दगड टाकून जड बनवला आणि छान घर तयार झालं . आता काम फत्ते म्हणून आईबाबांना घेऊन आला . त्या घरात जाणार तर पत्र्याची कड लागून टिमकूच्या पंखातून रक्त येऊ लागलं ..

आता मात्र टिमकू खूप जोराने रडू लागला . आईने त्याला जवळ घेतलं , बाबांनी औषध लावलं . टिमकू शांत झाल्यावर आई म्हणाली,"तू छान प्रयत्न केला,सगळी घर छान बनवली होती. त्यामुळे रडू नको . मला सांग इतके दिवस आपण तलावात मजेत राहत होतो मधेच घर का बांधायला घेतलंस ? "

" अगं आई आधी तलावाचे पाणी किती स्वच्छ होत . पण आता इथे सगळे येतात , फिरतात ,खेळतात , खाऊ खातात आणि सगळीकडे कचरा करतात , पाणीपण घाण झालं आहे . "

" हो,तुझं म्हणणं बरोबर आहे . पण घर ऐवजी आपण हा सगळा कचरा स्वच्छ केला तर ? आधीसारखं पूर्ण तलाव आपलं घर बनेल . हे काम आपण सगळे मिळून करु या आणि इथे येणाऱ्या सगळ्यांना पण सांगू या ."

टिमकूला आईचं म्हणणं पटलं .त्यानी आपल्या सगळ्या मित्रांना आणि तलावात रहाणाऱ्या कासवदादा , बेडूक भाऊ ,बदक ,बगळा सगळ्यांनाच बोलावलं . एक मोठी बैठक भरवली .त्यात फिरायला येणाऱ्या माणसांनाही बोलावलं . सगळ्यांनी मिळून तलाव आणि परिसर स्वच्छ केला . आणि यापुढे इथे कचरा करायचा नाही असं पक्क ठरवलं .

आता टिमकूचा तलाव आधीसारखा स्वच्छ,सुंदर निळाशार झाला आहे. टिमकू आईबाबांबरोबर छान फिरतो,मित्रांबरोबर खेळतो, मजेने राहतो.


No comments:

Post a Comment